म’श्वरमध्ये नव्याने बांधकाम झाल्यास कारवाई. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचा इशारा .कास अनधिकृत बांधकामे पाडण्याचे सातारा प्रांतांना आदेश जिल्ह्यात 1 लाख 50 हजार मतदार वगळले जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी : राज्यात सर्वाधित अर्ज सातारा जिल्ह्यात :

709

म’श्वरमध्ये नव्याने बांधकाम झाल्यास कारवाई

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचा इशारा : कास अनधिकृत बांधकामे पाडण्याचे सातारा प्रांतांना आदेश

सातारा :

महाबळेश्वरमधील जुन्या अनाधिकृत बांधकामांबाबत राज्य शासन निर्णय घेईल, पण त्याठिकाणी नव्याने बांधकाम होत असेल तर कारवाई करणार, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाबळेश्वर व कास अनाधिकृत बांधकामांबाबत विचारले असता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामांवर पूर्वी कारवाई केली आहे. उर्वरित बेकायदा बांधकामांवरही कारवाई केली जाणार आहे. संबंधित लोकांनी स्वत:हून बेकायदा बांधकामे काढून घ्यावीत अशी विनंती आहे. जुन्या बांधकामांबाबत राज्य शासन निर्णण घेईल. अनाधिकृत बांधकाम सील केले तर छुप्या पध्दतीने त्याठिकाणी पुन्हा बांधकाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नव्याने बांधकामे सुरु असतील तर ती पाडली जातील. यापूर्वी कुणी काय कारवाई केली याच्याशी काही देणेघेणे नाही. चुकीचे असेल तिथे दबावाला बळी न पडता कारवाई केली जाईल. शासन चांगले काम करणार्‍यांच्या नेहमीच पाठिशी राहते. कास अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी संबंधितांना मुदत दिली होती. मात्र त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही असे सांगत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना कास अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, कराड प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे पाटण प्रांताधिकारी सुनील गाडे व इतर उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 1 लाख 50 हजार मतदार वगळले

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी : राज्यात सर्वाधित अर्ज सातारा जिल्ह्यात

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दीड महिन्यांत लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरु आहे. मतदार नोंदणीसोबत मयत, स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यात 1 लाख 50 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून तितक्याच मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक मतदार अर्ज सातारा जिल्ह्यात भरुन घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये राज्यात सर्वाधिक मतदान अर्ज सातारा जिल्ह्यातून भरुन घेण्यात आले. जिल्ह्यातील सर्व 8 विधानसभा मतदारसंघात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये 1 लाख 50 हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली. अजून 50 ते 60 हजार मतदारांची नोंदणी करणे शक्य होणार आहे. स्थलांतरित, दुबार, मयत असलेल्या सुमारे 1 लाख 50 हजार मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली आहेत. याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठकीत चर्चा करण्यात आली. वगळलेल्या मतदारांसंदर्भात कुणाचीही तक्रार आलेली नाही. चुकून एखाद्या मतदाराचे नाव कमी झाल्याचे आढळून आल्यास पुन्हा त्या मतदाराची नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांत तहसीलदार, प्रांताधिकार्‍यांकडून कॅम्प लावण्यात येत आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात मतदार वगळण्यात व नोंदणी करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी तसेच कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 8 मतदार नोंदणी अधिकारी असून 12 सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. जिल्ह्यात 3 हजार 19 मतदान केंद्रांची संख्या आहे.

मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी 5 जानेवारी 2014 रोजी करण्यात येणार होती. मात्र त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने कळवल्यानुसार दावे व हरकती 26 डिसेंबरऐवजी 12 जानेवारीला निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिध्द करण्यात येणार होती ती आता 22 जानेवारीला अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात येणार आहे. नागरिकांनी 4 जानेवारीपर्यंत अर्ज संबंधित बीएलओ यांच्याकडे फॉर्म 6, फोटो, आधार कार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या झेरॉक्ससह जमा करावेत. असे आवाहन त्यांनी केले. शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत विचारले असता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले दि. 28 रोजी त्यासंदर्भात बैठका बोलावली आहे. एसपींना सोबत घेऊन संबंधित मार्गांची पाहणी करणार आहे. कोरोनाचे रुग्ण सापडत असले तरी घाबरुन जाऊ नये. काळजी घ्यावी. प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

भयमुक्त व पारदर्शक वातावरणातच निवडणूक : जितेंद्र डूडी

लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. मतदारांनी कुठल्याही अमीषाला बळी पडू नये. मतदारांना भयमुक्त वातावरणातमतदान करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. चुकीचे प्रकार आढळून आल्यास तातडीने संपर्क करावा. चुकीची माहिती प्रसारित करुन लोकांच्यात कुणी संभ्रम निर्माण करु नये यासाठी ‘इलेक्शन कॉर्डिनेशन अ‍ॅण्ड मॉनेटरिंग सेल’ स्थापन करण्यात आला असून आणखी उपाययोजना करण्यात येणार आहेत.