लोकवृत्त न्यूजचे ‘एफबी’ पेज हॅक
सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रा
सातारा / प्रतिनिधी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबूकवरील खाती हॅक होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. साताऱ्यातील लोकवृत्त न्यूज चॅनेल हेही फेसबूकवरील पेज हॅक केले असून, त्यावर अश्लिल पोस्ट केल्या जात आहेत. त्याबाबत लोकवृत्त न्यूज चॅनेलचे मालक/ संपादक सुजित बाळकृष्ण आंबेकर (वय ४५, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत नमूद केले आहे की, दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सुजित आंबेकर यांनी साताऱ्यातील दैनंदिन घडामोडी प्रसारित करण्यासाठी फेसबूकवर लोकवृत्त न्यूज हे पेज ओपन केले. त्यावेळी हे पेज हॅक झाल्याचे आढळून आले. त्यावर आंबेकर यांचे कोेणतेही नियंत्रण राहिले नाही. पेजवर कोणी तरी अज्ञात व्यक्ती पोस्ट करत आहे.
एप्रिलपासून आजपर्यंत विविध चित्रपटांचे व्हिडीओ, अश्लिल व्हिडीओ, फोटो पोस्ट केले जात आहेत. अज्ञात व्यक्तीकडून अशाप्रकारच्या पोस्ट करुन बदनामी केली जात असल्याचे सुजित आंबेकर यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबत आज सायंकाळी ६ वाजता अज्ञाताविरोधात सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा तपास करत आहेत.