कास रोडवरील अपघात विश्लेषण आणि उपाययोजना 

793

कास रोडवरील अपघात विश्लेषण आणि उपाययोजना

कास रोडवर यवतेश्वर रस्त्यावरील अपघातात एक हातातोंडाशी आलेली कमावती युवतीचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनेला आता आठवडा लोटला.

 

निष्काळजी आणि भ्रष्ट सिस्टीम ने केलेला मर्डर असे आपण या अपघाताला म्हणू शकतो का अपघाती मृत्यू ?

बोगद्याच्या अलीकडून घाट चालू झाला कि कास तलावापर्यंत पर्यटनाच्या नावाखाली अतिक्रमण भरभरून झाले, इतके कि पूर्वी निवांत हॉटेल च्या शेजारून पडणारा धबधबा पूर्ण बंद केला गेला जो पूर्वी सातारच्या अगदी राजपथावरून दिसायचा . कित्येक घळी , ओढे, नैसर्गिक प्रवाह एकतर मुजवले गेले किंवा अनैसर्गिकरित्या वळवले गेले.

 

यवतेश्वर ते कास जवळपास 200 हॉटेल्स असावीत , त्यांचे सांडपाणी कुठे जाते ? निसर्गातच सोडले जाते.

 

या सर्व हॉटेल्स चा कचरा कुठे जातो? निसर्गातच फेकला जातो. तो खाली आणून त्याची विल्हेवाट लावली जात नाही.

या सर्व हॉटेल्स मध्ये दोनचार सोडले तर प्रत्येक हॉटेल ला पाणीपुरवठा कुठून होतो ? तो हि 24 तास. साताऱ्यात तर पाणीकपात ठरलेली असतेच पण तुम्ही वरती कधी पाणीकपात ऐकली आहे, अनुभवली आहे ? सगळं काही बेकायदेशीर .

 

सर्वात महत्वाचे म्हणजे या रस्त्यावरील अपघात हे दारू पिऊन गाडी चालवताना होतात .

 

आता या कास रोडवर किती परमिट रम बिअर बार आहेत ?

फक्त एकच .. मग तुम्हाला जवळपास प्रत्येक छोट्या / मोठ्या हॉटेल्स मध्ये सर्रास, राजरोसपणे दारू कशी मिळते ? तिथे दारू पिण्यास परवानगी का घ्यावी लागत नाही ?

 

इतक्या वेळा घाट चढला कि पोलीस गाड्या चेक करताना दिसतात पण गाडीत दारू सापडलीय अन त्या गाडीवर पोलिसांनी कधी कारवाई केल्याचे कधी ऐकलंय का ? कुठे पेपर मध्ये वाचलंय ? मग पोलीस काय ज्यांच्या गाडीत दारू सापडते त्यांना ओवाळतात ? जर कारवाईच होत नाही तर जनतेवर वचक बसेलच कसा ?

 

फार लांब नको, ज्या दिवशी अपघात झाला त्यानंतर किती कारवाया झाल्या ? अपघाततील काही माहिती खरच लपवली गेलीय का ?

 

वरती व्यवसाय करणारे हॉटेल्स, रिसॉर्ट्स यांच्या घरातील अजून कोण अशा अपघातात गेले नाही म्हणून ते या अपघातांकडे दुर्लक्ष करतात का ?

 

पोलीस खात्यातील कोणा अधिकारी यांच्या घरातील अजून असा अपघाती बळी गेला नाही म्हणून ते दुर्लक्ष करतात का ?

 

नगरपालिका , संबंधित ग्रामपंचायत , प्रदूषण विभाग आणि इतर संबंधित विभागात काम करणारे आहेत ज्यांच्या अंडर हा रस्ता येतो त्यांच्या घरातील कोण गेल्यावर त्यांना जाग येणार का ?

 

जोपर्यंत सामान्य जीव जात आहेत तोपर्यन्त हे काहीच उपाययोजना करणार नाहीत का ?

 

जर या पूर्ण रस्त्यावर एकच ऑफिशिअल परमिट रूम आहे तर इतर ठिकाणी पोलिसांची कधी रेड का पडत नाही ?

 

तुमच्या हॉटेलमध्ये दारू सर्व्ह करताना, पिताना ग्राहक दिसले तर कडक कारवाई होईल असे अंडरटेकिंग पोलिसांनी घेतले तरी किमान 30-50 टक्के फरक पडेल. यवतेश्वर घाटात तरुणाई रोड च्या साईडकटयांवर बसून राजरोसपणे दारू / बिअर पित असते हे कोणाला दिसत नाही का ? पोलीस स्वतःच डोळ्यांवर पट्टी घालून नक्की कोणाला पाठीशी घालतात ?

 

सातारचे नेते मोठ्या वलग्ना करतात मग कधी हा प्रश्न , त्यावर उपाय त्यांना सुचत नाही का ? हा प्रश्न त्यांच्यापाशी शेअर व्हावा त्यावर मार्ग निघावा अशा आकलनाचा आवाका असणारा एकही कार्यकर्ता या लोकप्रतिनिधी यांच्याकडे नाही का ?

 

या प्रश्नावर लोकवृत्त आ मार्ग निघेपर्यंत पाठपुरावा करणार आहेच , उपाययोजना सुद्धा वरील प्रश्नातच सुचवलेल्या आहेत.

 

सातारकर नागरिकांनी सुद्धा आता यावर आवाज उठवत राहील पाहिजे, प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस यांना प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत अन्यथा याच रस्त्यांवर आपल्यापैकीच कोणाच्या घरातील एक मृत्युमुखी पडेल अन तेंव्हा वेळ गेलेली असेल.

 

रस्ता, कचरा, अतिक्रमित बेकायदेशीर बांधकामे, विनापरवाना मद्यपान, फुकटचे 24 तास पाणी हे असेच कासचे प्रश्न आहेत . यातून फक्त भ्रष्टाचार वाढतोय, नागरिकांना सुरक्षा शून्य आहे.

 

सातारकर जागे व्हा आणि त्या युवतीचा मृत्यू हा अपघाती का भ्रष्ट सिस्टीम ने केलेला मर्डर यावर आवाज उठवा ..

 

सुजित आंबेकर

संपादक

लोकवृत्त

सातारा

9823377277