सातारचे निवासी उपजिल्हाधकारी पद रिक्त का ?

480

सातारचे निवासी उपजिल्हाधकारी पद रिक्त का ?

१ वर्षापासून कामाचा बोजा महसूल उपजिल्हाधिकारी यांच्यावर

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी यांची सर्व पदे भरली असताना गेले वर्षभरापासून निवासी उपजिल्हाधिकारी पद मात्र रिक्त आहे त्यामुळे महसूल उपजिल्हाधिकारी यांच्या वरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे.

एकतर महसूल उपजिल्हाधिकारी यांना गौण खनिज, वसूली, राजस्व अभियान, पिक पाहणी, पाणंद रस्ते अशी अनेक कामे असतात मात्र त्यात निवासी उपजिल्हाधिकारी चा अतिरिक्त भार असल्याने लोकांची निवेदने, प्रश्न, प्रोटोकॉल व्हीआयपी दौऱ्यात राज शिष्टचार अधिकारी म्हणून काम पाहणे शासकीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे, बिन शेती प्रकरणात चौकशी करून योग्य व नेमका अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणे, दंगल नियंत्रण, पुर दुष्काळ, साथीचे रोग इत्यादी नैसर्गिक आपत्तीत व्यवस्थापन करणे शिष्टमंडळ यांना भेटणं, प्रशासनात सुसूत्रता राखणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय मधील कामकाजावर देखरेख ठेवणे अशी असंख्य कामे असतात. पण निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार असलेले सातारचे महसूल उपजिल्हाधिकारी या सर्व कामांना योग्य तो न्याय देवू शकत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

 

दोन्ही पदांची जबाबदारी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही गेले वर्षभर शासनाने हे पद रिक्त का ठेवले आहे? या पदावर काम करण्यासाठी ५ अनुभवी कार्यक्षम अधिकारी येण्यास इच्छुक आहेत पण त्यांना का येवू दिले जात नाही?

 

सातारचे तत्कालीन RDC सुनिल थोरवे यांची बदली झाल्यानंतर भूसंपादन उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, निवडणूक

उपजिल्हाअधिकारी, तसेच तहसीलदार कोतवाल येवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयातील शेकडो लिपिक आणि अव्वल कारकूनांच्या बदल्या झाल्या. तलाठ्यांनी सजे आणि सर्कल ने मंडळे बदलली. तरीही सातारा ला RDC का मिळत नाही हा प्रश्न जिल्ह्यातील तमाम नागरिकांना पडला आहे?

 

सातारा मधील कर्तव्य दक्ष पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार व तमाम आमदार यांना कसं कळत नाही का मुद्दाम हेच याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत?

 

आता ट्रिपल इंजीन चे गतिमान सरकार सातारा जिल्ह्याचा गतिमान विकास करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पद भरतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील व भाजपच्या जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना आहे .

 

सुजित आंबेकर

संपादक

लोकवृत्त